जालना- भिमा कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांची सभा जालना शहरातील संभाजी नगर भागात ६ जानेवारी रोजी सभा होत आहे. या सभेस आमचा विरोध असून वादग्रस्त विधाने करुन दोन समाजात तेड निर्माण करुन दंगली घडवणार्यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी देऊ नये अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे वंचित बहुजन आघाडीचे सुधाकर निकाळजे यांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगीतले.
संभाजी भिडे यांनी भिमा कोरेगाव येथे गेल्या वर्षी दंगल घडवण्यासाठी गावा गावात जाऊन सभा घेतल्या होत्या. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात दंगली झाल्या होत्या. त्यात अनेक निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तरुणांची डोके भडकावण्याचे काम भिडे करीत आहेत. जालना जिल्ह्यात येण्यामागे त्यांचा फक्त तरुणांची माथे भडकवण्याचा आणि दंगली भडकावण्याचा भिडे यांचा हेतू आहे. या कार्यक्रमासाठी आर एस एस च्या लोकांकडुन प्रोत्साहन मिळत असून, भाजपचे सहकार्य देखील भिडे यांच्या सभेला मिळत आहे. भाजपच्या नगरसेवकाच्या वार्डात हा कार्यक्रम आहे याचा अर्थ भाजपनेच हा कार्यक्रम आयोजित केला आहे. असा आरोप निकाळजे यांनी यावेळी केला. त्यामुळे त्यांच्या सभेवर बंदी घालन्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, पँथर सेना, संभाजी ब्रिगेडच्यावतीने करत आहोत.
नुकतीच एटीएसने नालासोपारा येथून बॉम्ब
बनवणारी आतंकवादी टोळी अटक केली आहे. यामध्ये सनातन संस्था, शिवप्रतिष्ठाण संघटनेचे आतंकवादी
असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोठ्या कार्यवाहीमध्ये जालन्यातून सुध्दा एकाला अटक
करण्यात आलेली आहे.त्याचा सनातन संस्था व शिवप्रतिष्ठाण संघटनेशी संबंध असल्याचे
स्पष्ट झाले आहे . शिवप्रतिष्ठाण ही भिडे यांची
संघटना असून या संघटनेचे कार्यकर्ते बॉम्ब बनवतानाच्या कार्यवाहीत अटक
झालेले आहेत. अशावेळी प्रशासन सरकार अशा दंगलखोरांना सभेची परवानगी देतेच कसे असा
प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थीत केला.
भिमा कोरेगाव नंतर देशभरातील आंबेडकरी, बहुजन समाजामध्ये संभाजी भिडे एकबोटे विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे. आरएसएस प्रणीत भाजप सरकार त्यांना पाठिशी घालत आहे अशा आरोपींना पाठीशी घालून सरकार तमाम बहुजनांची थट्टा करत आहे. संभाजी भिडे यांची सभा आयोजित करणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार, आमदार, पदाधिकारी आहेत. असा आरोपही आंबेडकरी नेत्यांनी केला. मराठवाड्यात दुष्काळ पडला असून त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप संभाजी भिडेच्या माध्यमातून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. भिडेच्या सभेला परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी गृह खातं, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.